वडखळ ते अलिबाग रस्ता चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

मुंबई, दि. २ : अलिबागच्या दिशेने होणारी वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी वडखळ ते अलिबाग मार्गाचे चौपदरीकरणाचे काम अधिक जलदगतीने पूर्ण व्हावे, यासाठी लवकरच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

विधानभवन येथे वडखळ-अलिबाग रस्त्याविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार पंडितशेठ देशमुख तसेच मंत्रालयीन व विभागीय पातळीवरील अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले, चौपदरीकरणाच्या कामास गती देवून रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक सहकार्य केंद्र सरकारकडून मिळावे, यासाठी सर्व आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल.

मुंबईतील प्रवाशांसाठी हा महत्त्वाचा मार्ग असून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग विकसित करणे, रस्ता दुरुस्ती आणि नियोजनबद्ध चौपदरीकरणाच्या कामास गती देणे ही काळाची गरज आहे.

वडखळ ते अलिबाग रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले म्हणाले, जमीन संपादन, पर्यावरणीय अडचणी यांसारख्या प्रश्‍नांची केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रवास सुखकर करण्यासाठी वडखळ ते अलिबाग रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/